जळगाव – “ शिक्षणाने समाजाच्या नैतिकतेला आणि विकासाला चालना प्राप्त होते. जन्माला आल्यापासून मनुष्याची शिक्षण प्रक्रिया आरंभ होत असते. शिक्षणात चारित्र्य निर्माण व सुजन नागरिकत्व या मूल्यांना अधिक महत्व आहे. उच्च शिक्षण हे सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची दिशा निश्चित करीत असते. आज वर्तमान परिस्थिती शिक्षणातील पथप्रदर्शक मूल्यांना किती चालना देते यावर विचारमंथनाची आवश्यकता आहे. तरुण पिढीला हताश होतांना पाहिल्यावर आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये किती सामर्थ्य आहे याची जाणीव होते. परंतु या पिढीत उद्दात भावना निर्माण करण्याची जबाबदारी ही व्यवस्था चालविणाऱ्या सर्व घटकांची आहे. आज नवनवीन आव्हाने निर्माण होतआहेत, उच्च शिक्षण संस्थांमधून अशा आव्हानांना उमेदीने सामोरे जाणारी तरुण तयार झाले पाहिजेत. त्यासाठी बदलत्या काळानुसार उच्च शिक्षण रचनेत परिवर्तन होणे आवश्यक आहे. सुदैवाने त्याची सुरुवात झालेली आहे. उच्च शिक्षण आयोग, युजीसी तर कौशल्याधारित शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे. गरज आहे ती आपल्यातील विधायक कौशल्याने आयुष्याचे सोने करण्याची.” असे विचार डॉ.डी.जी.हुंडीवाले यांनी स्व.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान आणि मुलांचे/मुलींचे (शहर) वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “एम.जे.हॉस्टेल व्याख्यानमाला-२०१८” चे विचार पुष्प गुंफताना प्रकट केले.
कार्यक्रमाचा आरंभ वसतिगृहातील विद्यार्थीनीनी गायलेल्या स्फूर्तीगीताने करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी देखील उपस्थित तरुण – तरुणींना उच्च शिक्षणातील आव्हाने व आपली वाटचाल या संबंधी मार्गदर्शन केले. तर विचारमंचावर अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानचे सचिव श्री.शशिकांत वडोदकर, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ.सुरेश तायडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसतिगृह प्रमुख प्रा.विजय लोहार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कु.तेजल परदेसी हिने करून दिला, सूत्रसंचालन अश्विन सुरवाडे याने केले. मोठ्या संख्येने होस्टेलमधील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.