‘वारी’ ची प्रत्यक्षात अनुभूती देणाऱ्या ‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन

Jalgaon news

जळगाव : पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. यंदाच्या आषाढी वारीचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला ‘वारी’ हा लोकराज्य विशेषांक ‘वारी’ ची प्रत्यक्षात अनुभूती देणारा असल्याचे मत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.

महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अतिथी संपादक असलेल्या लोकराज्यच्या ‘वारी’ या ऑगस्ट महिन्याच्या विशेषांकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके उपस्थित होते.

या विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘रंगले हे चित्त माझे विठुपायी’ असे म्हणत वारकऱ्यांसाठी संदेश दिला आहे. माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक तथा लोकराज्यचे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या लोकराज्य ‘वारी’ विशेषांकांत श्रीपाद अपराजित, डॉ. द. ता. भोसले, श्रीधरबुवा देहूकर, संदेश भंडारे, बाळासाहेब बोचरे, डॉ. यू. म. पठाण, प्रा. राम शेवाळकर, डॉ. प्रतिमा इंगोले, जयंत साळगावकर आदी मान्यवरांनी वारीच्या विविध अनुषंगाने विचार मांडले आहेत. तसेच जयंत साळगांवकर यांचा लेख पुनमुद्रित केला आहे. विठ्ठल-रुक्म‍िणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी समितीमार्फत भक्तांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली आहे. पुणे विभागाचे विभागीय महसुल आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गावर तसेच पंढरपूर येथे प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधा तसेच उपाय योजनांची माहिती दिली आहे. राज्य शासनामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या वारीसंदर्भातही विशेषांकात माहिती आहे.

आषाढी वारीच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क विभागाने प्रकाशित केलेला वारी विशेषांक वाचनीय आणि संग्राह्य असून तो प्रत्येकाने वाचावा, संग्रही ठेवावा. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री.निंबाळकर यांनी ‘वारी’ विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी केले. जिल्ह्यातील प्रमुख विक्रेत्यांकडे लोकराज्य वारी विशेषांक वाचकांसाठी उपलब्ध आहे. ज्या संस्थांना वारी विशेषाकांच्या प्रती विकत घ्यावायाचा असेल त्यांनी आपली मागणी जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधून नोंदवावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *