महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सामाजिक, आर्थिक उंची वाढविण्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांच्या शेतक-यांसाठीच्या कार्याबद्दल त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आलेली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकरी म्हणून शेतक-यांकरिता केलेल्या भरीव कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतक-यांचा सन्मान म्हणून त्यांचा जन्मदिवस राज्यात शेतकरी दिन म्हणून सन २०१४ पासून साजरा करण्यात येत आहे.
यावर्षी नारळी पोर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दि. २५ ऑगस्ट २०१८ रोजी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिवस राज्यात शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.
या दिवशी शेतकऱ्यांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या शेतक-यांसाठी असलेल्या विविध योजना/अभियान/उपक्रम इ. ची माहिती आणि लाभ घेण्याच्या कार्यपद्धती याबाबत तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य देण्याबाबत क्षेत्रिय स्तरावर सुचित करण्यात आले आहे.
शेतकरी दिन साजरा करताना जिल्हा स्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा) व कृषि विकास अधिकारी यांचे तसेच तालुका स्तरावर संबंधित तालुका कृषि अधिकारी, गट विकास अधिकारी, यांचे समन्वयाने कार्यक्रमाचे आयोजन करणेत येणार आहे.
तरी सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा. असे संचालक, विस्तार व प्रशिक्षण कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.