कापुस पिकावरील आकस्मिक मर रोगावर उपाययोजना : कृषि विभागाचे आवाहन

जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आकस्मिक मर रोगावर उपाययोजनांबाबत विचारणा करण्यात येत आहे. त्यानुसार कृषि विभागाने सुचविलेल्या उपायायोजना कराव्यात. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

आकस्मिक मर रोग :- बहुधा कापसाच्या संकरित वाणांवर येते. ही केवळ वनस्पतीच्या शरीर क्रियेमध्ये झालेल्या बिघाडामुळे होऊ शकते. कापूस पिकाची वाढ होण्यासाठी दिवसाचे तापमान 28 ते 35 ङि से. लागते. परंतु त्यापेक्षा अधिक तापमान दिर्घकाळ टिकून राहिल्यास कपाशीच्या शरिर क्रियेवर अनिष्ट परिणाम होतो. अशा वेळेस पिकास पाण्याचा ताण पडल्यास झाडाच्या पाने, फुले, बोंडे इत्यादी भागांना अन्नद्रव्याचा पुरवठा न झाल्याने पानांची चमक किंवा तजेला नाहीसा होतो व पाने मलुल होतात व सुकु लागतात.  पाने पिवळसर होवून पानगळ होते. झाडे संथगतीने सुकु लागतात.

उपाययोजना :- या विकृतीची लक्षणे दिसू लागताच 1.5 किलो युरिया  + 1.5  किलो पालाश ( म्युरेट ऑफ पोटॅश ) 100 लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण 150 ते 200 मि.ली. विकृतीग्रस्त झाडाच्या बुंध्याभोवती ओतावे व झाडांची मुळे पायांनी दाबून घ्यावे यानंतर 8 ते 10 दिवसानी 2 किलो डिएपी 100 लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण 150 ते 200 मि.ली. विकृतीग्रस्त झाडाच्या बुंध्याभोवती ओतावे. आवश्यकते नुसार हलके पाणी दयावे. लक्षणे दिसून येताच उपाययोजना केल्यास चांगला फायदा होते.

गुलाबी बोंड अळीपासून संरक्षणात्मक उपाययोजना

एकरी 8 कामगंध सापळे, दोन सापळयात 50 मी. अंतर ठेवून पिकांच्या उंचीपेक्षा 1 ते 1.5 फुट उंच लावावेत. त्यातील ल्युअर लावताना योग्य ती दक्षता घ्यावी. पिकांचे नियमित सर्वेक्षण करुन प्रति सापळा 8 ते 10 पतंग सलग 3 दिवस असल्यास किंवा 10 हिरव्या बोंडात 1 जीवंत अळी असल्यास पिकावर किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त आढळून आल्याने पिकावर क्विनॉलफॉस 20 % किंवा थयोडीकार्ब 75% 20 मि.ली. किंवा क्लोरपायरीफॉस  20%  ई.सी. 25 मि.ली किंवा सायपरमेथ्रील 10 % ई.सी. 10 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तालुकास्तरावर क्विनॉलफॉस व क्लोरपायरीफॉस औषधी अनुदानावर उपलब्ध आहेत.

पाते, फुले लहान बोडांची नैसर्गिक गळ थांबविण्यासाठी 10 लिटर पाण्यात 3-4 मि.ली नॅप्थॅलिक ॲसेटिक ॲसिड ( प्लॅनोफिक्स) हया संजीवकाची फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर दुसरी फवारणी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने करावी. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *