बहिणाईंच्या १३९व्या जयंतीनिमित्त काव्याद्वारे जागविल्या स्मृती
जळगाव प्रतिनिधी – मानवी जीवनाचा परिस म्हणजे संत वाङमय. यात माणसाला माणुसकीचे शहाणपण सांगणारे तसेच जगाच्या कल्याणाचा विचार असलेले आणि भारतीय संस्कृतीशी नाते जोडणारे कवयित्री बहिणाईंचे काव्य हे गीता-रामायणासारखेच आहे, असे सांगत लेखिका प्रा. डॉ. प्रमिला भिरूड यांनी काव्याव्दारे बहिणाईंच्या स्मृती जागविल्या.
बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट व भवरलाल ऍण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची १३९ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त प्रा. डॉ. प्रमिला भिरूड बोलत होत्या. सुरवातीला बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर दीपप्रज्वलन झाले. बहिणाबाई चौधरी यांच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणतसून स्मिता चौधरी, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त दिनानाथ चौधरी, कैलास चौधरी, ज्येष्ठ पत्रकार चंदूलाल नेवे,चौधरीवाड्यातील प्रियांका चौधरी, इंदूबाई चौधरी, जाऊबाई चौधरी, मिनल चौधरी,प्रिया चौधरी, सविता चौधरी, कांचन चौधरी, सुरेखा चौधरी, कविता चौधरी, शोभा चौधरी, वैशाली चौधरी, दिपाली चौधरी, देवेश चौधरी, हितेंद्र चौधरी, हरेश्वर चौधरी उपस्थित होते. यासह विनोद रापतवार, दिनेश दीक्षित, तुषार वाघुळदे, विजय जैन,किशोर कुळकर्णी, हर्षल पाटील उपस्थित होते.
‘ऐकावं ऐकावं कान दिसन ऐका ध्यानं दिसन…’ हे खंड काव्यात्मक चरित्र गावून बहिणाबाईंचे काव्य जे आपल्याला गवसले ते सर्वांपर्यंत पोहचविणे हे आपले कर्तव्य असल्याचे प्रा.डॉ. प्रमिला भिरूड यांनी सांगितले. महिलांनी घरकाम करता करता वाचन करावे. बदलत्या काळात भारतीय संस्कृतीचा वसा आणि वारसा जपला पाहिजे त्यासाठी बहिणाबाईंच्या काव्यातील चांगुलपणा हेरला पाहिजे. सरळ, साधे-सोपे बोलणे मात्र प्रतिभाशक्तीचे लेणं असलेले बहिणाबाईंचे जीवन प्रत्येकाने अभ्यासले पाहिजे असे सांगत बहिणाबाईंचा सासरच्या माणसांचा संवाद कवितेतून त्यांनी मांडला.
यावेळी दिनेश दीक्षित, हर्षल पाटील, तुषार वाघुळदे यांनी मनोगत व्यक्त केले.विनोद रापतवार यांनी प्रास्ताविक केले. रंजना चौधरी, अशोक चौधरी, देवेंद्र पाटील,राजू माळी, दिनेश थोरात व बहिणाबाईं मेमोरियल ट्रस्टच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.