सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करा – दिपक केसरकर

नंदुरबार : सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या माहितीची खात्री करावी त्यानंतरच ती माहिती पुढे पाठवावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर यांनी नुकतेच केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात नंदुरबार, धुळे व जळगांव जिल्ह्याचा कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेताना दिपक केसरकर बोलत होते. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील नंदुरबार, एम. रामकुमार धुळे, दत्तात्रय कराळे जळगांव व नंदुरबारचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यावेळी उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री दिपक केसरकर म्हणाले की, पोलीस कर्मचाऱ्यांकडून कामाची अपेक्षा करतांना शासन त्यांच्या समस्यांबाबतही गंभीर असून पोलिसांचा घराचा प्रश्न, कॅन्टीन, जिम, अपूर्ण कर्मचारी व काही ठिकाणी पोलीस स्टेशनचे बांधकाम याबाबत शासनस्तरावर निधी उपलब्ध करण्यासाठी वेगळा लेखाशिर्ष तयार करण्यात आला असून या लेखाशिर्षातून मोठ्या प्रमाणात पोलीस विभागाला निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

श्री.केसरकर म्हणाले, नंदुरबार व धुळे जिल्ह्यांसह राज्यात लहान मुलांना पळवून नेत असल्याबाबत समाजकंटकांकडून सोशल मीडिया व युट्यूबच्या माध्यमातून अफवा पसरवली जात आहे. काही ठिकाणी कोणतीही शहानिशा न करता निरपराध इसमांवर हल्ले होऊन वाहनांची जाळपोळ, मारहाण करुन लोकांना मारुन टाकण्यापर्यंतच्या गंभीर घटना घडल्या आहेत, अशा घटनांमध्ये निरपराध लोकांचा बळी गेला आहे. अशा घटनेला जबाबदार असलेल्या लोकांवर पोलीस प्रशासन कडक कारवाई करेलच परंतु जे काही लोक भितीपोटी पळून गेले त्यांनी आपल्या गावात यावे, त्यांनी जर कायदा मोडला नसेल तर त्यांच्यावर पोलीस कारवाई होणार नाही, परंतु कायदा हातात घेतला असेल तर त्यांना सोडले जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री.केसरकर म्हणाले, पोलीस स्टेशनचा दर्जा सुधारण्याच्या गरजेबरोबर जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्हे शोधण्यास व गुन्हेगारांवर वचक बसविण्यास मदत होईल.

नंदुरबार व धुळे सारख्या शहरात वाळू, गुटखा व लुटमार अशा नवीन गुन्हेगारी करणाऱ्या तरुणांच्या टोळ्या तयार होत आहेत. अशा गुन्हेगारी वृत्तीच्या टोळ्यांचा बिमोड पोलीस विभागाला करावयाचा असून यासाठी तीनही जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी व पोलिसांचा वचक निर्माण करुन पोलिसांची प्रतिमा लोकांमध्ये सुधारण्यासाठी प्रयत्न करावा. ज्या पोलीस स्टेशमध्ये अवैध धंदे सुरु असतील ते तातडीने बंद करावे अन्यथा संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रमुखावर सक्त कारवाई करण्यात येईल, असेही दिपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.

केसरकर पुढे म्हणाले की, राज्यासह तीनही जिल्ह्यातील संशयीत गुन्हेगारी मोडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक धोरण स्वीकारावे, गुन्हेगारांना पोलिसांची भिती वाटेल याची काळजी घेऊन सर्व सामान्य जनता पोलिसांना आपला मित्र समजेल अशी पोलिसांची प्रतिमा निर्माण करण्याची गरजही असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पोलीस काही वेळा खूप चांगले काम करतात धाडी टाकतात, जीवावर उधार होऊन कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करतात परंतु पोलिसांप्रती जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो हा संभ्रम दूर करण्यासाठी पोलीस विभागाला कामाचा दर्जा सुधारावा लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी जिल्हा पोलीस प्रमुख संजय पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्याचा पोलीस अधिक्षक एम रामकुमार धुळे व दत्तात्रय करावे यांनी आपल्या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा सविस्तर माहिती मंत्री महोदयांना दिली. संजय पाटील म्हणाले की, जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले असून जिल्ह्यातील तरुणांच्या टोळ्या निर्माण होत असतांना अशा तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्था यांची मदत घेण्यासाठी व तरुणांमध्ये प्रबोधन करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिल यासाठी आपण प्रयत्नशिल असून जिल्ह्यात अवैध धंद्याला वाव राहणार नाही यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणांकडून सक्तीने कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अफवांवर विश्वास ठेवू नये – पोलीस अधीक्षक संजय पाटील

नंदुरबार : मागील काही दिवसापासून राज्यातील काही जिल्ह्यांसह नंदुरबार, जिल्ह्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आली असून ती लहान मुलांना पळवून नेते. तसेच शरीरातील अवयव काढून घेत असल्याबाबत अफवा काही समाज कंटकांकडून व्हॉट्ॲप मेसेज अथवा संदेशाद्वारे पसरविली जात आहे. त्यामुळे निरपराध इसमांना नागरिकांनी मारहाण केल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात अशी कोणतीही प्रकारची टोळी कार्यरत नसून लहान मुले पळविणारी किंवा शरिरातील अवयव काढणाऱ्या घटना घडलेल्या नाहीत. सोशल मिडीयावरील अशा अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच नागरिकांनी केवळ संशयावरुन निरपराध इसमांना मारहाण किंवा छळ करु नये तसेच वाहनांची जाळपोळ करु नये नागरिकांनी कृपया अशा अफवांना बळी न पडता सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे. संशय असल्यास कायदा हातात न घेता तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 210100 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *